Thursday, July 1, 2010

Point of View.

         ठाण्याला असतांनाची गोष्ट.
        नेहमीप्रमाणे फिरायला निघालो. सोबत केमेरा होताच. ’दिसामाजी काही तरी ते लिहावे’ असे रामदास स्वामींनी म्हटले आहे.  तसेच एका प्रख्यात फोटोग्राफरने ’दिसामाजि एक तरी फोटो काढावा ’असे लिहिले आहे.
हे दोन्ही आदेश मी पाळायचे ठरविले आहे.
        आज पावले थोडी वेगळ्या दिशेने वळविली. संजय गांधी उद्यानाकदे निघालो. डाव्या हाताला डोंगरांची रांग होती. तिच्यावरील झाडामागून सकाळची प्रभा  फाकू लागली होती. रात्री पाऊस पडून गेला होता,त्यामुळे वातावरणात आर्द्रता होती. सुखद असा गारवाही होता. डोंगराच्या पायथ्याकडे माझे लक्ष गेले .तेथे एक खूप मोठी इमारत बांधली जात होती. बांधकाम अर्धवट होते. त्या इमारतीच्या मागे आकाशात ,मला एक पुसटसे इंद्रधनुष्य दिसले. जणू तिच्या मस्तकावर खोवलेला तुराच. मी क्लिक केले.
       तेवढ्यात मागून एक आवाज आला.
       "नमस्कार"
       मी मागे वळून पाहिले.एक चाळिशीतला माणूस समोर उभा होता.
      "नमस्कार."
     "काही उपयोग नाही सर." तो पुढे म्हणाला.
      मला कळाले नाही. कशाबद्दल म्हणतोय हा ?कशाचा उपयोग नाही ? 
      "काय " मी विचारले.
      "काही उपयोग नाही फोटो काढण्याचा. ही इमारत आहे ना ,ते बेकायदा बांधकाम आहे . ते सुरू झाल्यापासून
       मी पाठपुरावा करतोय. फोटो काढले ,पेपरला पाठविले ,काही उपयोग झाला नाही. कुणीच दखल घेतली 
       नाही.झाडी नष्ट होत आहे,पर्यावरणाचा नाश होत आहे ,राखीव जागेवर धनदांडगे इमारती उठविताहेत....
      कुणालाच पर्वा नाही. तुम्ही प्रयत्न करा ,एखाद्या पेपरला पाठवून पाहा ,कुणी छापते का  ?"
      मी म्हणालो, "तुमची खंत योग्य आहे. तुम्ही पाठपुरावाही केलात. ही एका व्यक्तीच्या हातातील गोष्ट उरलेली
      नाही. पण खरे सांगू का ? मी फोटो काढतांना तुमचा हा point of view माझ्या ध्यानात आला नव्हता."
      "म्हणजे ?"
      "म्हणजे मी त्या द्रुष्टीने तिकडॆ पाहिलेच नाही .ही इमारत बेकायदेशीर आहे ,पर्यावरणाचा नाश करून तयार
      होते आहे हे माझ्या ध्यानातच आले नव्हते.तुम्ही लक्षात आणून दिल्या बद्दल आभार ."
      "मग तुम्ही फोटो का काढत होता ?"
      मी म्हणालो, "अहो,त्या इमारतीच्या वर आकाशात इंद्रधनुष्य दिसते आहे ना....ते पाहा...थोडे पुसट आहे..
      ते composition मला आवडले ,म्हणून मी फोटो घेतला ."
      त्याने काळजीपूर्वक पाहिले, "खरेच की ,आकाशात छान इंद्रधनुष्य दिसते आहे. मी तिकडेच पाहात होतो,          
      पण मला दिसले नाही ."
      मग क्षणभर थांबून हसत , तो म्हणाला ,"तुम्ही दाखविल्याबद्दल आभार.."

    आम्ही हस्तांदोलन केले.तो त्याच्या वाटेने निघाला.  
     मी माझ्या.              .
        ’

Sunday, June 20, 2010

माकडे.


   प्राणी हळूहळू आपल्या जीवनातून हद्दपार होवू लागले आहेत की काय अशी शंका आजकाल मला येऊ लागली आहे. मुंबईला असतांनाची गोष्ट सोडा, पण नांदेडला देखील प्राण्यांची गाठ भेट होण्याचे प्रसंग दुर्मिळ झाले आहेत.
नांदेडच्या कॉलनीत हमखास दिसणारे प्राणी दोनच-कुत्री आणि डुकरे. त्यातही बेवारस कुत्र्यांची संख्या इतकी वाढली आहे की ती दिसली नाहीत तरच बरं वाटतं. डुकरं सहसा दिसतात ती त्यांच्यामागे वडरांची पोरे लागल्यावर जीव घेऊन पळणारी,चित्कारणारी. अष्टविनायक नगर मध्ये राहायला आल्यावर सुरुवातीला एक गाय हमखास दुपारच्या वेळी दारी यायची. थोडीफ़ार पोळी भाकरी किंवा भाताचे चार घास तिच्यासाठी ठेवलेले असत.पण एकदा ती अचानक यायची बंद झाली ती झालीच...
     गतवर्षी एकदा दुपारी गच्चीवर धपधप पावलांचे आवाज ऐकू आले. वर जऊन पाहिले तर आंब्याच्या झाडावर चक्क आठ दहा माकडांनी हल्ला केला होता. त्यावर्षी प्रथमच त्या झाडाला कैर्‍या लागल्या होत्या. कॉलनीतील उडाणटप्पू पोरांपासून त्या वाचविण्याचा आमचा आटापिट सुरू झाला होता. अचानक हे दुसरे आस्मानी संकट
आंब्यावर चालून आले होते. फ़ांद्यावर बसून प्रत्येक माकड एकेक कैरी चघळत होते. मी काठी वाजविली तर त्यांच्या प्रमुखाने चक्क माझ्याकडे पाहून दात विचकले. बाकीची माकडे आपल्या नेत्याकडे कौतुकाने पाहत होती. मी वाचमनला बोलावले. गच्चीवर एक पत्रा पडला होता. आम्ही तो जोर्जोराने वाजविण्यस सुरुवात केली.त्या आवाजाला कंटाळून म्हणा किंवा पोट भरल्यामुळे म्हणा,माकडे एकामागोमाग निघून गेली. जातांना
त्यांचा लीडर माझ्याकडे पाहून काहीतरी पुटपुटला. बहुतेक  "आठ दिन के बाद फ़िर आऊंगा, देखता हूं क्या करते हो "असे म्हणाला असावा  कारण चारसहा दिवसांनी ती टोळी पुन्हा आलीच. उन्हाळा संपेपर्यंत अर्ध्या कैर्‍या माकडाय स्वाहा झाल्या .
    माकडे नेहमीच आक्रमक असतात असे नाही. आपले खाणे झाल्यावर ती निवांतपणे विश्रांती घेतांना मी त्यांना अनेकदा पाहिले आहे. असाच एक फ़ुरसतीचा क्षण मी एकदा कॅमेर्‍यात टिपला होता. दुपारची वेळ
होती. एका घराच्या गच्चीवर एक माकडीण व तिचा जोडीदार बसले होते. माकडीण समोर बसली होती व तिचा जोडीदार मागे बसून तिच्या केसातल्या उवा उपटत होता. त्यांचे एक अतीशय लहान दुबळे मूल बाजूला खेळत होते. एकमेकांच्या केसातील उवा काढणारी माकडे हे तसे नेहमीचेच द्रुष्य. पण त्या पिल्लामुळे त्याला एक मस्त कौटुंबिक टच मिळाला होता
    ह्या जोडीच्या पासून काही अंतरावर एक माकडीण आपल्या पिल्लाला घेऊन बसली होती  .
      .
  
 .       मी त्या कुटुंबाचे फोटो काढतो आहे हे तिने पाहिले होते . अर्थात फ़ोटो काढणे म्हणजे काय हे तिला माहीत असणे शक्य नव्हते. पण हा काहीतरी माकडचाळे [की माणूसचाळे?] करतो आहे हे तिला कळाले असावे. मी कॅमेरा तिच्याकडे वळ्विताच ती खुदकन हसली. ती हसली हे आपले मला वाट्ले. नेमके तिच्या मनात कोणते भाव होते कोण जाणे..आज हा फोटो अनेकदा पाहूनही मला पक्के सांगता येत नाही.
      एकदा माहूरला चाललो होतो. माहूरची माकडे त्यांच्या खोड्याबद्दल फार प्रसिद्ध आहेत. प्रवाशांच्या हातातल्या वस्तूही ती सहज पळवितात. त्यामुळे एका पुलाजवळ मला एक माकड अगदी स्तब्ध बसलेले दिसले तेव्हा गंमतच वाटली. जवळ गेलो असतो तर ते पळाले असते. दुरूनच झूम करून पाहिले. कसलातरी गंभीर विचार ते करीत असावे. पुलाच्या कठड्याची लोखंडी चौकट त्याच्या भोवती तयार झाली होती...
                  त्याच्या कुटुंबापासून,मित्रांपासून दूर येऊन,एकटे ते कसला विचार करीत होते , कोणता बिकट प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत होते ?  कोणत्या प्रश्नाची जाडजूड चौकट त्याच्या भोवती तयार झाली होती ?कधीकधी एकटा ,विचारमग्न बसलो असतांना मला ते माकड आठवते. त्याचा प्रश्न सुटला असेल का हा प्रश्न मात्र सुटत नाही..                                                                              

Monday, May 31, 2010

समुद्र आणि उंट

.


               तसे अनेक ठिकाणचे समुद्र पाहिले पण मला सर्वाधिक आवडला तो गणपतीपुळेचा समुद्र. त्या समुद्राने माझे मन एवढे काही मोहून टाकले की पुन्हापुन्हा मला गणपतीपुळ्याला जावेसे वाटते.

             पुळ्याला प्रथम गेलो होतो त्यावेळी सायंकाळ झाली होती. महाराष्ट्र शासनाच्या रेस्टहाउसचे बुकिंग केले होते.  तिथली खोली ताब्यात घेतली,सामान ठेवले आणि हातपाय धुवुन दर्शनास निघालो.
सोबत पुष्पाही होती.गणपतीचे मंदिर अगदी जवळच होते. स्वच्छ ,सुंदर, टुमदार असे ते मंदिरही मला पाहताक्षणीच आवडले. दर्शन घेतले आणि दुसर्‍या दरवाज्याने बाहेर पडलो तो समोर समुद्राचा भव्य विस्तार दिसला. रात्र झालेली होती,किनार्‍यावर फ़ारशी गर्दी नव्हती. आम्ही वाळूत जावून बसलो. पाठीमागे परमेश्वर,
समोर परमेश्वराचेच एक सगुण रूप .. समुद्र.....
    मागून मंद आवाजात भजनाचे स्वर ऐकू येत होते. समोरून समुद्राची गाज. हे दोन ध्वनी अलगदपणे
एकमेकात मिसळून गेले होते. त्यांच्याशिवाय इतर कोणताच आवाज नव्हता .मूकपणे  आम्हीही कितीतरी वेळ पार्श्वसंगीत असलेली शांतता अनुभवीत बसून राहिलो.
      आकाशात चांदण्या उगवल्या होत्या. चंद्राची कोरही वर आली होती. लाटांवर हलकेसे सौम्य चांदणे पसरले होते.उसळणार्‍या लाटांचा आवेगही आता कमी झाला होता. गती अपरिहार्य आहे,थांबता येत नाही म्हणूनच केवळ त्या पुढे येत होत्या,मागे जात होत्या. त्यांना शक्य झाले असते तर त्याही काही काळ स्तब्ध झाल्या असत्या.  किनार्‍यावरची जवळजवळ सारी मंडळी  उठून गेली. गस्त घालणार्‍या रक्षकांच्या शिट्ट्या ऐकू येउ
लागल्या. नाइलाजाने आम्ही उठलो. खोलीवर जाऊन झोपलो. खोलीच्या मागे सुमारे दोनशे फ़ूट अंतरावर समुद्र उचंबळत होता. रात्रभर त्याची मंद गाज सतत ऐकू येत होती. भल्या पहाटे उठल्यावर मी एक हायकू लिहिला होता..............
                                                   रात्रभर समुद्र मनास खेळवत राहिला
                                                   जागवत राहिला,झोपवत राहिला
                                                  झोपवत राहिला,जागवत राहिला......
          सकाळी उठलो. समुद्रावर जऊन स्नान केले. गजाननाचे दर्शन घेतले व प्रदक्षिणा करण्यास नि्घालो.
एका मोठ्या टेकडीचा उतार जिथे संपतो तेथे गणपतीचे मंदिर आहे. दर्शन घेतले की त्या टेकडीला प्रदक्षिणा
घालण्याचा इथे रिवाज आहे.एक लहानसा सुरेख प्रदक्षिणा मार्ग बांधला आहे. ही सुमारे एक किलोमिटरची प्रदक्षिणा मन प्रसन्न करणारी होती. त्यानंतर अनेक वेळा पुळ्याला गेलो पण सकाळची प्रदक्षिणा चुकविली नाही. नवा कॅमेरा घेतल्यावर परवा पुन्हा तेथे गेलो. धुक्यातून नुकतेच प्रवेश करू लागलेले सूर्यकिरण,सोनेरी किरणात चमकणारी हिरवी पाने, मंद शीतल हवा , गोड सकाळ जणू प्यावीशी वाटत होती
                                                                                                                                                      म्य
                                                          -
.            टेकडीच्या उंच टोकावरून समुद्राचा अपार विस्तार नजरेत भरत होता. त्याचे रूप मनात व कॅमेर्‍यात साठवत पायर्‍यांनी खाली आलो. समुद्रकिनार्‍यावर अजून वर्दळ सुरु झाली नव्हती. दूरवर वाळूत मला काहीतरी रंगीबेरंगी वस्तू चमकताना दिसली. पायर्‍यावर थांबून कॅमेरा झूम करून पाहिले. तीन उंट वाळूत अगदी किनार्‍याजवळ जाऊन बसले होते. त्यांच्या पाठीवरची रंगीत कापडं प्रकाशात चमकत होती. थोड्या वेळात येथे माणसे मुले यांची वर्दळ सुरु होइल. मुले उंटावर बसण्याचा हट्ट करतील. मग उंटवाले त्यांना,आई बाबाना
उंटावर बसवून चकरा मारून आणतील. उंटांच्या कामाचा दिवस सुरु होईल.
            पण त्याला अजून वेळ होता. उंट निवांतपणे समुद्राकडे पाहात बसले होते. काय विचार चालले असतील त्यांच्या मनात? फोटोची फ्रेम मी अडजस्ट केली. चौकटीत आता अलीकडे फिकट मातकट रंगाची  वाळूची टेकडी होती. पलीकडे करड्या रंगाचे उंट बसलेले. त्यांच्या गडद तपकिरी माना. त्यांच्या अंगावर लाल पिवळी लाकडे व कापडे..किनार्‍याकडॆ येणार्‍या लाटेवरचा पांढरा शुभ्र फेस...आणि पलीकडे समुद्राचे कुठे फिकट निळे,तर कुठे गडद निळे पाणी..
          हा फोटो मला खूप आवडतो. रंगसंगती तर सुरेख जमली आहेच पण प्रभातकालीन ताजेपणा व एक निरामय निवांतता या फोटोत प्रतिबिंबित झाली आहे असे मला वाटते.

आता घेऊ या एक लहानशी विश्रांती.....पंधरा दिवसांची....                                                                                                                                                                                                                                                                                  

Saturday, May 22, 2010

समुद्र,मी आणि कोलाज...

                आयुष्यात पहिला फोटो काढला होता तो समुद्राचा,हे मी पूर्वी सांगितलेच आहे. तो फ़िल्मवर नीट उतरला  नाही ही गोष्ट वेगळी.पण समुद्राची प्रतिमा माझ्या मनाच्या फ़िल्मवर नीटच उमटली होती. त्यावेळी समुद्र जो मनात येऊन बसला तो कायमचाच. समुद्रच तो. तो काय शांत बसणार? वेळोवेळी त्याला भरती येते आणि मग एखाद्या समुद्रकिनार्‍यावर जाऊन मनमुराद भटकावे वाटते. त्यानंतर अनेक वेळा समुद्र पाहिला. भल्या पहाटे, भर दुपारी, सायंकाळी, रात्री, उत्तररात्री, तारांकित आकाशाखाली, तर कधी शुभ्र चांदण्यात.....त्याची असंख्य रूपे पाहिली, मनात साठवली ,तशीच कॅमेर्‍यातही बद्ध करून ठेवली. समुद्र प्रत्येक वेळी मला नवाच वाटतो . चिरनूतन !निसर्गाची रूपं तशी चैतन् भारलेली असतात, पण समुद्राचा जिवंतपणा काही निराळाच.
             सतत येत राहणार्‍या आणि ओसरणार्‍या  लाटामुळे समुद्राच्या रूपाला कधी एकसुरिपणा येत नाही  नवी लाट नव्या उत्साहाने किनार्‍याकडे धावत येते ,किनार्‍यावर विखुरते. समुद्र काहीसा मागे सरकतो. त्याचवेळी मागून येणारी लाट किनार्‍याशी गळामिठी घेण्यासाठी धावते.जीवनसातत्याचे समुद्राहून भव्य असे
दुसरे प्रतीक नाही
             एकदा एका साहित्यसंमेलनासाठी गोव्यात गेलो होतो. त्यावेळी गोव्याच्या किनार्‍यांवर खूप भटकलो.
पाण्यात उभा असतांना मित्राने मुंबईला काढलेल्या माझ्या फोटोची आठवण झाली. किनार्‍यावर माझ्यासारखे अनेक जण भटकत होते. त्यापैकी एकाजवळ मी माझा कॅमेरा दिला व त्याला माझा फोटो काढण्याची विनंती केली..त्याने आनंदाने माझी इच्छा पूर्ण केली. घरी गेल्यावर मी तो फोटो संगणकावर चढविला,जुन्या अल्बममधून पुराणा फोटो शोधून काढला ,त्याला स्कॅन केले व तोही नव्या फोटोजवळ नेऊन ठेवला. दोन्ही फोटो एकत्र पाहिले तेव्हा मोठी गंमत वाटली .दोन्हीत खूप
साम्य जाणवले , तसाच बराच फरक देखील. समुद्र तसाच आहे,बदल झाला आहे तो माझ्यात . दोन फोटोत सुमारे ३५ वर्षांचे अंतर आहे. ’अंगावरून’ बरेच पाणी वाहून गेले आहे, [त्यापैकी बरेचसे अंगात साठलेलेही आहे]
                   ..दोन्ही फोटोकडे आळीपाळीने पाहतांना एक मजेशीर विचार मनात आला. दोन्ही फोटोत तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला मी आहे. फक्त पहिल्या फोटोत मी उंबरठ्यातून आत प्रवेश करतो आहे,तर दुसर्‍या फोटोत उंबरठ्यातून बाहेर पडायची तयारी सुरु आहे. कुठेतरी मी वाचले होते,कुठे ते आता आठवत नाही,-डोंगरावर चढणारा आणि उतरणारा दोघेही एकाच पातळीवर आले तरी ते एकाच भूमिकेत नसतात. हे दोन फोटो पाहतांना मला त्याची आठवण झाली,आणि मी त्या फोटोंचा कोलाज करून टाकला. त्यांना अक्षरश: एका पातळीवर आणले. पहिला फोटो काळापांढरा होता तर दुसरा रंगीत. दोन्हीच्या मिश्रणामुळे एक वेगळाच रंग नव्या फोटोला आला....
                   अनेकवेळा आपण जुने दिवस आठवतो,त्या दिवसात भटकून येतो. परत आल्यावर असाच एखादा नवा रंग मनावर चढत असेल काय?
                    असावा....
      

Wednesday, May 12, 2010

फोटो:कॉनराड रिक्टरचा.



[मागील अंकावरून पुढे चालू.]
कॅमेर्‍याने केलेल्या प्रयोगाची कहाणी मी गेल्यावेळी सांगितली होती. अर्थात हा प्रयोग मी काही जगात पहिल्यांदा केला होता असे नव्हे. ही तर फक्त एक लहानशीच तांत्रिक खेळी होती.पण ती आपण करण्यातही आनंद होता ना! तेव्हाचा तो आनंद मला अजून आठवतो.
हा आनंद पुन्हा एकदा आठवला तो एका फोटोमुळेच. वर दिलेल्या दोन फ़ोटोपैकी दुसरा फोटो हा रिक्टरने त्याचा स्वत:चा काढलेला दुहेरी फोटो आहे.
रिक्टर हा माझा अत्यंत आवडता लेखक. त्याच्या कादंबर्‍यांची मी अनेक पारायणे केली आहेत. १९७० च्या सुमारास मी प्रथम रिक्टरच्या कादंबर्‍यांची जी.ए.नी केलेली मराठी भाषांतरे -’रान’,’शिवार’,व ’गाव’ वाचली,आणि मी त्याच्या प्रेमातच पडलो. मग त्याची अनेक पुस्तके मिळवून वाचली. मराठीत रिक्टरच्या आठ कादंबर्‍या अनुवादित झाल्या आहेत. पण बरेच दिवस त्याची मूळ इंग्रजी पुस्तके उपलब्ध नव्हती. अजूनही ती तशी दुर्मिळच आहेत.
रिक्टर हा तसा अलक्षित लेखक. उच्चभ्रू टीकाकारांनी त्याला कधी महान म्हटले नाही. त्याचे त्यांनी ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून वर्गीकरण करून टाकले आहे. मात्र त्याच्या कादंबर्‍या वाचल्यानंतर त्याची असामान्यता कळते. सुमारे एक वर्षापूर्वी त्याचे एक तपशीलवार दीर्घ चरित्र प्रकाशित झाले आहे.[Conrad Richter-A writer's Life.by David R. Johnson]
एखादा माणूस लेखन हेच आपले जीवितकार्य आहे अशी मनाची खूणगाठ बांधून केवढ्या अक्षरनिष्ठेने आयुष्यभर संघर्ष करीत राहतो याचे विलक्षण दर्शन या चरित्रातून घडते.
कॉनराडचे वडील हे एक लोकप्रिय दुकानदार होते. पण वयाची चाळिशी उलटतांना त्यांच्या मनात धर्मगुरु बनण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली . उत्तम चाललेला व्यवसाय बंद करून ते धर्मशिक्षणाच्या कॉलेजमध्ये दाखल झाले. यावेळी कॉनराड फक्त १० वर्षाचा होता. या निर्णयाचा रिक्टर कुटुंबावर फार मोठा परिणाम झाला. अनेक वर्षे त्यांना आर्थिक ओढग्रस्तीच्या परिस्थितीत,अभावाच्या सावलीत काढावी लागली. तारुण्यात प्रवेश करतांना कॉनराडच्या मनावरही कुटुंबाच्या ह्या अवस्थेचा मोठा ताण निर्माण झाला होता. एकीकडे खूप पैसे मिळवून आपल्या आईला सुखात ठेवण्याची स्वप्ने तो पाही,आणि दुसरीकडे आपल्यात ही क्षमता नाही असे वाटून खिन्न व उदास होई.
कॉनराड लहानपणापासून अतीशय लाजराबुजरा ,आत्ममग्न असा होता. मधूनच त्याला उत्साहाचे भरते येई. आपल्या आत दोन वेगवेगळी व्यक्तिमत्वे दडून आहेत असे त्याला तरुणपणापासून जाणवू लागले होते. वर जो फोटो दिला आहे तो कॉनराडने वयाच्या अठराव्या वर्षी काढलेला स्वत:चा Double Exposure फोटो आहे. या फोटोत जे दोन कॉनराड दिसतात त्यापैकी एक कोट ,टाय घालून,घराच्या पायरीवर आरामात बसून हसणारा तरूण आहे. तर दुसरा पायर्‍याशेजारी कोट न घालता उभा राहिलेला काहीसा बुजलेला तरुण आहे. कॉनराडच्या चरित्रकाराच्या मते,त्याने हा फोटो जाणीवपूर्वक घेतलेला आहे किंवा नाही हे सांगता येत नाही,पण त्याची बाह्य जगात वावरतांना दिसणारी दोन वेगवेगळी रूपे प्रतीकात्मकरित्त्या या फोटोत उमटली आहेत.
हा फोटो पाहतांना मला आणखी एक गोष्ट जाणवली. Double Exposure चा हा प्रयोग कॉनराडने १९०७ साली केला. मी तसाच प्रयोग १९७४ साली केला. पण कॉनराडने केलेला प्रयोग अत्यंत सफाईदार आहे ,दोन प्रतिमांचे मिक्सिंग अतीशय उत्तम जमलेले आहे. तुलनेने मी काढलेला फोटो फारच प्राथमिक स्वरूपाचा वाटतो. अमेरिकन तरुण आणि भारतातील एका लहान गावातला तरुण यांच्यातील पूर्वापारपासूनच्या सांस्क्रुतिक तफावतीचे हे दोन फोटो प्रतीक आहेत असे मला वाटते....
[पुढील गोष्ट पुढील अंकी ]




]

Sunday, April 25, 2010

चौकट



[मागील अंकावरून पुढे चालू.]

नोकरी लागली की पहिला कॅमेरा विकत घ्यायचा असे ठरविले होते तरी प्रत्यक्षात कॅमेरा हाती यायला थोडा वेळच लागला.
माझा पहिला पगार होता ३०९रु.६०पैसे,आणि या पैशाला अनेक वाटा होत्या. मुख्य म्हणजे कितितरी वर्षापासून मला खुणावणारी पुस्तके मला विकत घ्यायची होती. पुस्तके हे माझे पहिले प्रेम होते-अजूनही आहे. पगारातील एक ठराविक भाग पुस्तके विकत घेण्यासाठी खर्च करायचा हेही ठरविलेले होते. आपल्या घरी आपला स्वत:चा ग्रंथसंग्रह असावा असे स्वप्न मन पाहू लागले होते. त्यामुळे दुसरीकडे खर्च करायला काही उरतच नव्हते. पण अधूनमधून कॅमेर्‍याचे दुकान खुणावायचेच.
कॅमेरा घेतला तो मात्र अगदी अनपेक्षितपणे. बैंकेत दर महिन्याला एक गरीब पोरगा पगाराच्या दिवशी येऊन लॉटरीची तिकिटे घेण्याचा आग्रह करायचा. त्याच्या मागे लागण्याला कंटाळून, एकदा त्याच्याकडून एक तिकिट विकत घेतले. त्याला चक्क ५० रु.चे बक्षीस लागले. मनात पहिला विचार आला तो कॅमेर्‍याचा. नांदेडला कॅमेरा मिळू शकेल असे एकच दुकान होते.त्या दुकानदाराला विचारले आणि घरी जाताना ५५ रु.चा’ क्लिक ३’ घेऊनच गेलो.
हा एक साधा बॉक्स कॅमेरा होता. अडजस्टमेंट जवळजवळ नव्हत्याच. बघायचे आणि क्लिक करायचे. नंतरचे काही महिने क्लिकमयच होवून गेले. अर्जुनाच्या हाती धनुष्य आल्यावर तो दिसेल त्या वस्तूवर बाण मारू लागला,तसे माझे झाले. पण अर्जुनाला बाण फुकट मिळायचे,आणि मला मात्र रोल विकत घेण्यासाठी व धुण्यासाठी पैसे मोजावे लागायचे,व हे पैसे अनेकदा बजेटमध्ये बसायचे नाहीत. मात्र त्यामुळे एक बरे झाले की निवड करून फोटो काढण्याची सवय लागली. [पुढे डिजिटल कॅमेरा हाती आल्यावर त्या सवयीचे बारा वाजले ती गोष्ट वेगळी. पण ती खूप नंतरची गोष्ट.]
फोटो काढायचे म्हणजे एक तर जवळच्या व्यक्तींचे किंवा निसर्गाचे एवढीच ढोबळ कल्पना सुरुवातीला मनात होती. धाकटी बहीणभावंडे ही तर हक्काची मॉडेल्स. मात्र हळूहळू असे फोटो काढतांना काही वेगळ्या कोनातून काढण्याचा प्रयत्न सुरु झाला.
उदा.बहिणीचा व भावाचा एक फोटो मी भिंतीला पडलेल्या एका छिद्रातून काढला होता. एकदा रात्री मेणबत्तीच्या प्रकाशात फोटो काढण्याचा प्रयत्न केला ,पण तो जमला नाही. बरे या बाबतीत शिकविणारे कुणीच नव्हते.सगळा ट्रायल व एरर चा मामला.
’क्लिक ३’मध्ये फोटो काढल्यानंतर बोटाने रीळ पुढे सरकवून नवी फ़िल्म भिंगासमोर आणावी लागे. एकदा ते रीळ सरकावयाचे राहिले व घेतलेल्या फोटोवरच दुसरा फोटो आला. ते कॉम्बिनेशन मोठे मजेदार वाटले. त्यातून मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली. कॅमेर्‍याचे भिंग अर्धे झाकणारा एक कपडा मी त्याभोवती बांधला. समोर शुभदाला-माझ्या बहिणीला- बसविले,आणि व्ह्यू फ़ाईंडर मधून अंदाजाने तिला अर्ध्या भागात घेऊन फोटो काढला. त्यानंतर दुसरीकडील अर्ध्या भागावर कपडा झाकला व आता तिला उभे करून पुन्हा पहिल्याच निगेटिव्हवर क्लिक केले. आता हा फोटो कसा येईल याची उत्सुकता लागली होती.
रोलमध्ये काही फ़िल्म अजून शिल्लक होत्या,त्या पटापट वापरून टाकल्या व रोल धुण्यास टाकला.
तिसर्‍या दिवशी जेव्हा दुकानात जाऊन प्रिंट पाहिल्या तेव्हा मी स्वत:वरच जाम खुश झालो .डबल एक्स्पोजरचा फोटो छानच आला होता. यंत्राने आखलेली चौकट कल्पनाशक्तीच्या साह्याने मोडता येते हे मला प्रथम तेव्हा जाणवले. बरेच दिवस घरी कुणी आले की मी त्याला तो फोटो दाखवायचो. त्याने कौतुक केले की आपल्यात काही कला आहे असे वाटायचे. अर्थात इतर कलाप्रमाणे तिचाही आवाका मर्यादित आहे हे जाणवायला खूप दिवस जावे लागले. मात्र काही काळ माझा इगो या फोटोमुळे सुखावला गेला होता एवढे खरे.
[पुढील गोष्ट पुढील बुधवारी... .]

Thursday, April 22, 2010

समुद्र,कॅमेरा आणि मी


फोटो काढून घेण्याचे प्रसंग लहानपणी तसे कमीच आले .त्या काळात फोटो काढणे ही चैनेची गोष्ट होती. कॅमेरा हाताळता
येणे तर जवळजवळ अशक्यच.
पहिल्यांदा कॅमेरा हाताळला तो दिवस कोणता होता,आठवत नाही,पण कॅमेर्‍याने पहिला फोटो समुद्राचा काढला होता हे मात्र पक्के ध्यानात आहे.
कॊलेजमध्ये शिकत असतांनाची गोष्ट. मुंबईला एका मित्राकडे आलो होतो. एके दिवशी मित्राने मला समुद्र पाहावयास नेले. नदी किंवा तळे यापेक्षा मोठा पाण्याचा साठा न पाहिलेला मी ,आयुष्यात प्रथमच समुद्र पाहत होतो. नजर जाते तिथपर्यंत पाणीच पाणी हे द्रुष्य विलक्षणच होते. एखादा देखावा नजरेत न मावणे म्हणजे काय असते याचा अनुभव मी प्रथमच घेत होतो. एका पाठोपाठ धावत येऊन किनार्‍यावर आदळणार्‍या लाटा . एक लाट ओसरली की दुसरी तिच्या मागोमाग हजरच. चौपाटीवरल्या वाळूवरून चालतानाही मज्जा वाटत होती. चपला काढून ठेवल्या व धावत धावत पाण्यात शिरलो. लाटा पायावर आदळून किनार्‍याकडे जात होत्या. लाट ओसरली की पाणी परत जाताना पायाखालची वाळू सरकायची. प्रथम भीती वाटली पण नंतर पंचमहाभूतापैकी एकाचे एवढे विशाल दर्शन घडताना शरीर मनाला पंख फुटल्यासारखे झाले.
मित्र किनार्‍यावरून कौतुकाने पाहत होता. त्याने सोबत कॅमेरा आणला होता. माझे व समुद्राचे अनेक फोटो त्याने काढले.
"आता तू माझा फोटो काढ." मित्र अचानक म्हणाला.
फोटो काढून बघण्याची तीव्र इछा मनात निर्माण झाली होतीच,पण संकोचामुळे मी काही बोललो नव्हतो. त्याने कॅमेरा माझ्या हातात दिला. तो म्हणाला,"काही अवघड नाही. हा इथे व्ह्यू फाइंडर आहे.त्यातून पाहायचे. हे बटण क्लिक करायचे."
हे प्रकरण इतके सोपे असेल असे वाटले नव्हते. मी कॅमेरा हातात घेतला व काचेतून पाहिले. समुद्राचा एक तुकडा समोरच्या चौकटीत बंदिस्त झाला होता. मी क्लिक केले. ’फोटो निघाला असेल काय? चांगला आला असेल काय?’फिल्म जोवर धुतली जाणार नाही तोपर्यंत हे कळणे अशक्य होते.
मित्र म्हणाला आता " माझा फोटो काढ."
तो पाण्यात जाऊन उभा राहिला. मी व्ह्यु फाइंडर मधून पाहिले. तो एका कोपर्‍यात दिसत होता. मागे दूरवर समुद्र.
कॅमेरा थोडा उजवीकडे वळविला. आता मित्र मध्यभागी होता. ’कोणता फोटो घ्यावा,चौकटीत काय आले म्हणजे चांगले दिसेल,आकाश किती येऊ द्यायचे? की समुद्रावरच लक्ष केंद्रित करायचे?’ मनात प्रष्न येत होते. पण त्यांची उत्तरे आत्ताच मिळणार नव्हती. खूप वर्षानंतर हिचकॉकचे एक वाक्य वाचण्यात आले. "हा जो समोरचा चौकोन आहे ना,तो कसा भरायचा हे समजले की सिनेमा तयार करता येतो."
अर्थात त्यावेळी हे सारे समजणे कठीण होते. मला आठवते, मी एक फोटो मित्र डावीकडे असताना काढला,एक उजवीकडे असताना,तर तिसरा त्याला मध्यभागी ठेऊन. मल वाटले,’खरेच फोटो काढणे सोपे आहे की.’
दुसर्‍या दिवशी नांदेडला परत गेलो. रोल धुतला की फोटो पाठवितो असे मित्र म्हणाला होता. त्याच्या पत्राची आतुरतेने वाट पाहू लागलो. पंधरा दिवसांनी त्याचे पत्र आले. त्याने लिहिले होते,"सोबत तुझा समुद्रातला फोटो पाठवीत आहे. तू काढलेले चारही फोटो मात्र हलले. नाराज होवू नको. सुरुवातीला असे होतेच."
नाराज तर झालो होतोच. पण त्याच वेळी ठरविले की नोकरी लगल्यावर प्रथम एक कॅमेरा विकत घ्यायचा. पाहू फोटो कसे निघत नाहीत ते....
सोबतचा फोटो हा मित्राने काढलेला माझा आणि समुद्राचा फोटो आहे. फोटोग्राफीमधील माझ्या पहिल्या अपयशाची पार्श्वभूमी या फोटोला आहे.

Tuesday, April 20, 2010

स्मरणरंजन


गेल्यावेळी दाखविलेला फोटो हा माझा सर्वात जुना फोटो असला तरी माझ्याजवळचा सर्वात जुना फोटो वेगळाच आहे.
आई वारल्यानंतर तिच्या पेटीत मला तो सापडला. त्याचवेळी तो काहीसा पिवळा पडू लागला होता. फोटो सुमारे ७०
वर्षापूर्वीचा असावा. आईचे माहेर बीड. घरातली परिस्थिती साधारण असली तरी आईची आई फ़ार रसिक होती. बीडमध्ये
त्या काळी फ़ार तर ४/५ जणाकडे ग्रामोफोन असेल. त्यापैकी एक घर माझ्या आईचे होते. आजोबा कामावर गेले की ती व तिची आई झोपाळ्यावर बसून गाणी ऐकत बसत.
तर आजीपशी आईने एकदा फोटो काढायचा हट्ट धरला. आई आजीची फ़ार लाडकी होती. आजोबा देखील तिच्यावर फ़ार माया करीत. आजीने लगेच आजोबांना सांगून फोटोग्राफ़रला घरी बोलाऊन घेतले.[मी जेव्हा सुरेश मामांना हा फोटो दाखविला तेव्हा त्यांनी मला ही गोष्ट सांगितली.]घराच्या आतल्या आंगणात एक गालिचा टाकला होता. त्यावर एक खुर्ची ठेऊन तिच्यावर सगळ्यात धाकट्या मामाला बसविले होते.या फोटोत ती परकर पोलके घातलेली चिमुरडी आहे ना,ती माझी आई.तेव्हाची कु.कालिंदी राक्षसभुवनकर.
उजवीकडे शर्ट धोतर आणि डोक्यावर काळी टोपी घालून उभे आहेत ते माझे मोठे मामा. माझ्या लहानपणी,मला आठवते,मामा खूपच ऐटबाज दिसायचे. बालपणीच्या आनंदाच्या दिवसापैकी बरेच मी त्यांच्या घरी घालवले आहेत.
जमीनीवर गालिचा अंथरला आहे. त्यावर बसले आहेत ते मधले मामा. दोन्ही मामांच्या डोक्यावर आजोबा घालीत त्या काळ्या टोप्या आहेत. आईने दोन ससे पाळले होते. त्यापैकी एकाने फोटोतही हजेरी लावलेली दिसते. त्याला पकडून ठेवावे की कॅमेर्‍याकडे पहावे अशी धांदल मधल्या मामाची झालेली दिसते.
कॅमेर्‍याने टिपून ठेवलेला हा एक आनंदी क्षण. नंतर काही दिवसांनीच ही चारही भावंडे चार दिशांनी पांगली. एक आई सोडली तर प्रत्येकाच्या वाट्याला खडतर आयुष्य आले. मोठ्या मामावर नोकरीत काहीतरी बालंट आले. कोर्टाच्या वार्‍या सुरु झाल्या. नोकरी गेली. नंतर त्यांनी अनेक व्यवसाय करून पाहिले. पण घसरलेली स्थिती सावरली नाही. दारिद्र्य व दुर्दैवाने
त्यांना पूर्ण ग्रासून टाकले. दिवा लहान होत होत विझून जावा तसे एके दिवशी ते संपून गेले.
ससा घेऊन बसलेले ते दोन नंबरचे सुरेश मामा.लहानपणीच आई वारल्यावर वहिनीशी न पटल्यामुळे ते घरून पळून गेले.
शालेय शिक्षण मध्येच सोडल्यामुळे आयुष्याची घडी विस्कटली ती कायमचीच.त्यांचा आवाज गोड होता,ते उत्तम चित्रे काढायचे.
पण जगण्याच्या खटाटोपात ह्या कला तशाच राहून गेल्या. सारे आयुष्य त्यांनी असे अभावाच्या सावलीतच काढले.
खुर्चीवर बसलेले ते धाकटे रमेश मामा. त्यांना माझ्या आईने आमच्याकडेच ठेऊन घेतले. त्यांनी शेतकी खात्याचा डिप्लोमा केला,बर्‍यापैकी नोकरी लागली. आईला वाटले एक भाऊ तरी मार्गाला लागला. तिने त्यांचे लग्नही करून दिले. पण लग्नानंतर तीन महिन्यातच बायको वारली. हा धक्का त्यांनी धीराने पचविला. काही दिवसांनी दुसरे लग्न केले. पण अचानक आजारी पडून मामाच वारले. एक कहाणी सुरु होत होताच संपली.
आईचे सारे आयुष्य सात मुले व नातेवाईक ,पै पाहुणा यांच्यासाठी कष्ट उपसण्यात गेले. पुढे आम्ही मुले उत्तम शिकलो,आम्हाला चांगल्या नोकर्‍या लागल्या. आम्हाला वाटले,तिला आतातरी आराम देता येईल. मात्र देवाला ते मंजूर नसावे. अचानक कुठूनसा कॅन्सरचा राक्षस आला आणि त्याने तिला गिळून टाकले.
आज मोठे मामा नाहीत,धाकटे मामा नाहीत,आई नाही..या क्षणाचे एकमेव साक्षीदार सुरेशमामा उरले आहेत.
आज या फोटोकडे पाहिले की उदास वाटते. मग आपण अशा भूतकाळातल्या क्षणाकडे का वळतो? आठवून दु:ख होईल हे माहीत असले तरी? स्मरणरंजनामुळे नेमके काय मिळते?...

कॅमेरा आणि मी


कॅमेरा आणि मी.........................
कॅमेर्‍याची पहिली भेट झाली ती वयाच्या सुमारे दहाव्या वर्षी. दर वर्षी
प्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही बरीचशी चुलत भावंडे कन्नडला आमच्या आजोळी जमलो होतो. दिवसभर आंबे खाणे व धिंगाणा करणे या शिवाय दुसरा कार्यक्रम नव्हता. अशात एके दिवशी सकाळीच मोठ्या काकांनी ओर्डर सोडली,” आज सगळ्यांनी लौकर आंघोळी करायच्या. चांगले कपडे घालायचे. आज तुमचे फोटो काढायला काका येणार आहेत.”
’फोटो काढायचे? आमचे? कशासाठी?’ माझ्या मनांत प्रष्नांची भिंगरी सुरु झाली. घरात देवदेवतांचे फोटो होते. माणसाचा असा एकच फोटो होता. माझ्या आजोबांचा. त्यांना मी कधीच पाहिले नव्हते.पहिल्यांदा आजोळी गेलो तेव्हा मी काकांना विचारले होते, “हा फोटो कुणाचा आहे?”
“तुझ्या आजोबांचा-माझ्या वडिलांचा.”
पूर्वी कधीतरी बोलण्यातून आजोबा देवाघरी गेल्याचा संदर्भ आलेला ध्यानात होता. भिंतीवर देवाचे फोटो लावतात तसे देवाघरी गेलेल्यांचे ही संगती जुळत होती. तरी मी विचारले, “फोटो का लावतात?”
“अरे, त्यांची आठवण रहावी म्हणून.”
हे संभाषण मला आठवले. मी विचारले, “आमचे फोटो का काढणार?”
सुटी संपल्यावर तुम्ही आपापल्या गावी जाणार. मग तुमची आठवण माझ्याजवळ नको का?”
फोटो आणि आठवण यांचे असे समीकरण पक्के मनात बसले. तरी मनातले प्रष्न संपले नव्हतेच.
“फोटो कसे काढतात?”
“तुझे प्रष्न संपतच नाहीत बाबा. आता तू उद्या पाहा तुझ्या डोळ्यांनी. पण त्या काकांना काहीबाही विचारून भंडावून सोडू नकोस.”
सकाळी सर्वांच्या आधी माझी आंघोळ झाली होती. चांगले कपडॆ घालून, भांग पाडून पावडर लाऊन मी दारासमोरच्या ओट्यावर जाऊन बसलो होतो. बर्‍याच प्रतीक्षेनंतर एकदाचे फोटोवाले काका आले. त्यांच्याजवळ एक मोठे खोके होते. त्या खोक्यातून जादुगाराच्या पोतडीतून काढावी तशी एकेक वस्तू काढावयास सुरुवात केली. आदल्या वर्षीच दिवाळीच्या सुमारास शाळेत एका जादुगाराने त्याचे कार्यक्रम केलेले मनात बसले होते. त्यामुळे कॅमेरा आणि जादू यांचेही समीकरण मनात ठसले.
काकांनी खोक्यातून आणखी एक खोके काढले. जमीनीवर तीन काठ्या उभारून त्यावर ते खोके बसविले. त्याच्या मागे जावून आमच्याकडे पाहिले, व मग ते आम्हाला पायर्‍यावर नीट बसवू लागले. आम्ही सारेजण अगदी ’देवासारखे’ बसलो होतो. कुणाची हलायचीही हिंमत नव्हती. काका पुन्हा खोक्यामागे गेले. आता त्यांनी सामानातून एक मोठा काळा कपडा काढला. तो डोक्यावर कॅमेर्‍यावर पांघरला. मग डोके बाहेर काढून ते म्हणाले, “आता हलू नका बिलकुल. इकडे बघा, या भिंगाकडे...हं..थोडं हसा...घाबरू नका...”
अनेक सूचना देऊन त्यांच्या मनासारखे झाल्यावर ते पुन्हा कॅमेर्‍याच्या मागे गेले. त्यांनी हलू नका म्हणल्यावर आम्ही आणखी ताठ बसलो. काकांनी कसले तरी बटण खालीवर केले, आणि डोके बाहेर काढून ते म्हणाले, “हं..झाले..उठा आता.”
“काका, फोटो काढला?” मी विचारले.
“हो.”
“मग दाखवा की.”
“आत्ताच नाही, उद्या मी घेऊन येइन.”
एक दिवस वाट पाहायची म्हणजे कठीण होते. पण नाइलाज होता. दुसर्‍या दिवशी सारे लक्ष काकांच्या येण्याकडॆच होते. फोटो पाहिला आणि मनात आश्चर्य दाटून आले. मी असा दिसतो? आजवर आरशात अनेक वेळा चेहरा पाहिला होता. पण फक्त चेहराच. पूर्ण मी असा आहे हे प्रथमच ’दिसत ’होते. आपल्याला जे दिसत नाही ते दाखविणारे यंत्र म्हणजे कॅमेरा असाही काहीसा विचार मनात येऊन गेला.
शेजारचा फोटो हा कॅमेर्‍याने काढलेला माझा पहिला फोटो. या फोटोत मध्यभागी दिसणारा गुटगुटीत पोरगा म्हणजे मी. पुढे या मीचे व कॅमेर्‍याचे जे सख्य जमले त्याची कहाणी यापुढे चालू राहील.........