ठाण्याला असतांनाची गोष्ट.
नेहमीप्रमाणे फिरायला निघालो. सोबत केमेरा होताच. ’दिसामाजी काही तरी ते लिहावे’ असे रामदास स्वामींनी म्हटले आहे. तसेच एका प्रख्यात फोटोग्राफरने ’दिसामाजि एक तरी फोटो काढावा ’असे लिहिले आहे.
हे दोन्ही आदेश मी पाळायचे ठरविले आहे.
आज पावले थोडी वेगळ्या दिशेने वळविली. संजय गांधी उद्यानाकदे निघालो. डाव्या हाताला डोंगरांची रांग होती. तिच्यावरील झाडामागून सकाळची प्रभा फाकू लागली होती. रात्री पाऊस पडून गेला होता,त्यामुळे वातावरणात आर्द्रता होती. सुखद असा गारवाही होता. डोंगराच्या पायथ्याकडे माझे लक्ष गेले .तेथे एक खूप मोठी इमारत बांधली जात होती. बांधकाम अर्धवट होते. त्या इमारतीच्या मागे आकाशात ,मला एक पुसटसे इंद्रधनुष्य दिसले. जणू तिच्या मस्तकावर खोवलेला तुराच. मी क्लिक केले.
तेवढ्यात मागून एक आवाज आला.
"नमस्कार"
मी मागे वळून पाहिले.एक चाळिशीतला माणूस समोर उभा होता.
"नमस्कार."
"काही उपयोग नाही सर." तो पुढे म्हणाला.
मला कळाले नाही. कशाबद्दल म्हणतोय हा ?कशाचा उपयोग नाही ?
"काय " मी विचारले.
"काही उपयोग नाही फोटो काढण्याचा. ही इमारत आहे ना ,ते बेकायदा बांधकाम आहे . ते सुरू झाल्यापासून
मी पाठपुरावा करतोय. फोटो काढले ,पेपरला पाठविले ,काही उपयोग झाला नाही. कुणीच दखल घेतली
नाही.झाडी नष्ट होत आहे,पर्यावरणाचा नाश होत आहे ,राखीव जागेवर धनदांडगे इमारती उठविताहेत....
कुणालाच पर्वा नाही. तुम्ही प्रयत्न करा ,एखाद्या पेपरला पाठवून पाहा ,कुणी छापते का ?"
मी म्हणालो, "तुमची खंत योग्य आहे. तुम्ही पाठपुरावाही केलात. ही एका व्यक्तीच्या हातातील गोष्ट उरलेली
नाही. पण खरे सांगू का ? मी फोटो काढतांना तुमचा हा point of view माझ्या ध्यानात आला नव्हता."
"म्हणजे ?"
"म्हणजे मी त्या द्रुष्टीने तिकडॆ पाहिलेच नाही .ही इमारत बेकायदेशीर आहे ,पर्यावरणाचा नाश करून तयार
होते आहे हे माझ्या ध्यानातच आले नव्हते.तुम्ही लक्षात आणून दिल्या बद्दल आभार ."
"मग तुम्ही फोटो का काढत होता ?"
मी म्हणालो, "अहो,त्या इमारतीच्या वर आकाशात इंद्रधनुष्य दिसते आहे ना....ते पाहा...थोडे पुसट आहे..
ते composition मला आवडले ,म्हणून मी फोटो घेतला ."
त्याने काळजीपूर्वक पाहिले, "खरेच की ,आकाशात छान इंद्रधनुष्य दिसते आहे. मी तिकडेच पाहात होतो,
पण मला दिसले नाही ."
मग क्षणभर थांबून हसत , तो म्हणाला ,"तुम्ही दाखविल्याबद्दल आभार.."
आम्ही हस्तांदोलन केले.तो त्याच्या वाटेने निघाला.
मी माझ्या. .
’
