
[मागील अंकावरून पुढे चालू.]
नोकरी लागली की पहिला कॅमेरा विकत घ्यायचा असे ठरविले होते तरी प्रत्यक्षात कॅमेरा हाती यायला थोडा वेळच लागला.
माझा पहिला पगार होता ३०९रु.६०पैसे,आणि या पैशाला अनेक वाटा होत्या. मुख्य म्हणजे कितितरी वर्षापासून मला खुणावणारी पुस्तके मला विकत घ्यायची होती. पुस्तके हे माझे पहिले प्रेम होते-अजूनही आहे. पगारातील एक ठराविक भाग पुस्तके विकत घेण्यासाठी खर्च करायचा हेही ठरविलेले होते. आपल्या घरी आपला स्वत:चा ग्रंथसंग्रह असावा असे स्वप्न मन पाहू लागले होते. त्यामुळे दुसरीकडे खर्च करायला काही उरतच नव्हते. पण अधूनमधून कॅमेर्याचे दुकान खुणावायचेच.
कॅमेरा घेतला तो मात्र अगदी अनपेक्षितपणे. बैंकेत दर महिन्याला एक गरीब पोरगा पगाराच्या दिवशी येऊन लॉटरीची तिकिटे घेण्याचा आग्रह करायचा. त्याच्या मागे लागण्याला कंटाळून, एकदा त्याच्याकडून एक तिकिट विकत घेतले. त्याला चक्क ५० रु.चे बक्षीस लागले. मनात पहिला विचार आला तो कॅमेर्याचा. नांदेडला कॅमेरा मिळू शकेल असे एकच दुकान होते.त्या दुकानदाराला विचारले आणि घरी जाताना ५५ रु.चा’ क्लिक ३’ घेऊनच गेलो.
हा एक साधा बॉक्स कॅमेरा होता. अडजस्टमेंट जवळजवळ नव्हत्याच. बघायचे आणि क्लिक करायचे. नंतरचे काही महिने क्लिकमयच होवून गेले. अर्जुनाच्या हाती धनुष्य आल्यावर तो दिसेल त्या वस्तूवर बाण मारू लागला,तसे माझे झाले. पण अर्जुनाला बाण फुकट मिळायचे,आणि मला मात्र रोल विकत घेण्यासाठी व धुण्यासाठी पैसे मोजावे लागायचे,व हे पैसे अनेकदा बजेटमध्ये बसायचे नाहीत. मात्र त्यामुळे एक बरे झाले की निवड करून फोटो काढण्याची सवय लागली. [पुढे डिजिटल कॅमेरा हाती आल्यावर त्या सवयीचे बारा वाजले ती गोष्ट वेगळी. पण ती खूप नंतरची गोष्ट.]
फोटो काढायचे म्हणजे एक तर जवळच्या व्यक्तींचे किंवा निसर्गाचे एवढीच ढोबळ कल्पना सुरुवातीला मनात होती. धाकटी बहीणभावंडे ही तर हक्काची मॉडेल्स. मात्र हळूहळू असे फोटो काढतांना काही वेगळ्या कोनातून काढण्याचा प्रयत्न सुरु झाला.
उदा.बहिणीचा व भावाचा एक फोटो मी भिंतीला पडलेल्या एका छिद्रातून काढला होता. एकदा रात्री मेणबत्तीच्या प्रकाशात फोटो काढण्याचा प्रयत्न केला ,पण तो जमला नाही. बरे या बाबतीत शिकविणारे कुणीच नव्हते.सगळा ट्रायल व एरर चा मामला.
’क्लिक ३’मध्ये फोटो काढल्यानंतर बोटाने रीळ पुढे सरकवून नवी फ़िल्म भिंगासमोर आणावी लागे. एकदा ते रीळ सरकावयाचे राहिले व घेतलेल्या फोटोवरच दुसरा फोटो आला. ते कॉम्बिनेशन मोठे मजेदार वाटले. त्यातून मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली. कॅमेर्याचे भिंग अर्धे झाकणारा एक कपडा मी त्याभोवती बांधला. समोर शुभदाला-माझ्या बहिणीला- बसविले,आणि व्ह्यू फ़ाईंडर मधून अंदाजाने तिला अर्ध्या भागात घेऊन फोटो काढला. त्यानंतर दुसरीकडील अर्ध्या भागावर कपडा झाकला व आता तिला उभे करून पुन्हा पहिल्याच निगेटिव्हवर क्लिक केले. आता हा फोटो कसा येईल याची उत्सुकता लागली होती.
रोलमध्ये काही फ़िल्म अजून शिल्लक होत्या,त्या पटापट वापरून टाकल्या व रोल धुण्यास टाकला.
तिसर्या दिवशी जेव्हा दुकानात जाऊन प्रिंट पाहिल्या तेव्हा मी स्वत:वरच जाम खुश झालो .डबल एक्स्पोजरचा फोटो छानच आला होता. यंत्राने आखलेली चौकट कल्पनाशक्तीच्या साह्याने मोडता येते हे मला प्रथम तेव्हा जाणवले. बरेच दिवस घरी कुणी आले की मी त्याला तो फोटो दाखवायचो. त्याने कौतुक केले की आपल्यात काही कला आहे असे वाटायचे. अर्थात इतर कलाप्रमाणे तिचाही आवाका मर्यादित आहे हे जाणवायला खूप दिवस जावे लागले. मात्र काही काळ माझा इगो या फोटोमुळे सुखावला गेला होता एवढे खरे.
[पुढील गोष्ट पुढील बुधवारी... .]

No comments:
Post a Comment