.
तसे अनेक ठिकाणचे समुद्र पाहिले पण मला सर्वाधिक आवडला तो गणपतीपुळेचा समुद्र. त्या समुद्राने माझे मन एवढे काही मोहून टाकले की पुन्हापुन्हा मला गणपतीपुळ्याला जावेसे वाटते.
पुळ्याला प्रथम गेलो होतो त्यावेळी सायंकाळ झाली होती. महाराष्ट्र शासनाच्या रेस्टहाउसचे बुकिंग केले होते. तिथली खोली ताब्यात घेतली,सामान ठेवले आणि हातपाय धुवुन दर्शनास निघालो.
सोबत पुष्पाही होती.गणपतीचे मंदिर अगदी जवळच होते. स्वच्छ ,सुंदर, टुमदार असे ते मंदिरही मला पाहताक्षणीच आवडले. दर्शन घेतले आणि दुसर्या दरवाज्याने बाहेर पडलो तो समोर समुद्राचा भव्य विस्तार दिसला. रात्र झालेली होती,किनार्यावर फ़ारशी गर्दी नव्हती. आम्ही वाळूत जावून बसलो. पाठीमागे परमेश्वर,
समोर परमेश्वराचेच एक सगुण रूप .. समुद्र.....
मागून मंद आवाजात भजनाचे स्वर ऐकू येत होते. समोरून समुद्राची गाज. हे दोन ध्वनी अलगदपणे
एकमेकात मिसळून गेले होते. त्यांच्याशिवाय इतर कोणताच आवाज नव्हता .मूकपणे आम्हीही कितीतरी वेळ पार्श्वसंगीत असलेली शांतता अनुभवीत बसून राहिलो.
आकाशात चांदण्या उगवल्या होत्या. चंद्राची कोरही वर आली होती. लाटांवर हलकेसे सौम्य चांदणे पसरले होते.उसळणार्या लाटांचा आवेगही आता कमी झाला होता. गती अपरिहार्य आहे,थांबता येत नाही म्हणूनच केवळ त्या पुढे येत होत्या,मागे जात होत्या. त्यांना शक्य झाले असते तर त्याही काही काळ स्तब्ध झाल्या असत्या. किनार्यावरची जवळजवळ सारी मंडळी उठून गेली. गस्त घालणार्या रक्षकांच्या शिट्ट्या ऐकू येउ
लागल्या. नाइलाजाने आम्ही उठलो. खोलीवर जाऊन झोपलो. खोलीच्या मागे सुमारे दोनशे फ़ूट अंतरावर समुद्र उचंबळत होता. रात्रभर त्याची मंद गाज सतत ऐकू येत होती. भल्या पहाटे उठल्यावर मी एक हायकू लिहिला होता..............
रात्रभर समुद्र मनास खेळवत राहिला
जागवत राहिला,झोपवत राहिला
झोपवत राहिला,जागवत राहिला......
सकाळी उठलो. समुद्रावर जऊन स्नान केले. गजाननाचे दर्शन घेतले व प्रदक्षिणा करण्यास नि्घालो.
एका मोठ्या टेकडीचा उतार जिथे संपतो तेथे गणपतीचे मंदिर आहे. दर्शन घेतले की त्या टेकडीला प्रदक्षिणा
घालण्याचा इथे रिवाज आहे.एक लहानसा सुरेख प्रदक्षिणा मार्ग बांधला आहे. ही सुमारे एक किलोमिटरची प्रदक्षिणा मन प्रसन्न करणारी होती. त्यानंतर अनेक वेळा पुळ्याला गेलो पण सकाळची प्रदक्षिणा चुकविली नाही. नवा कॅमेरा घेतल्यावर परवा पुन्हा तेथे गेलो. धुक्यातून नुकतेच प्रवेश करू लागलेले सूर्यकिरण,सोनेरी किरणात चमकणारी हिरवी पाने, मंद शीतल हवा , गोड सकाळ जणू प्यावीशी वाटत होती
म्य
-
. टेकडीच्या उंच टोकावरून समुद्राचा अपार विस्तार नजरेत भरत होता. त्याचे रूप मनात व कॅमेर्यात साठवत पायर्यांनी खाली आलो. समुद्रकिनार्यावर अजून वर्दळ सुरु झाली नव्हती. दूरवर वाळूत मला काहीतरी रंगीबेरंगी वस्तू चमकताना दिसली. पायर्यावर थांबून कॅमेरा झूम करून पाहिले. तीन उंट वाळूत अगदी किनार्याजवळ जाऊन बसले होते. त्यांच्या पाठीवरची रंगीत कापडं प्रकाशात चमकत होती. थोड्या वेळात येथे माणसे मुले यांची वर्दळ सुरु होइल. मुले उंटावर बसण्याचा हट्ट करतील. मग उंटवाले त्यांना,आई बाबाना
उंटावर बसवून चकरा मारून आणतील. उंटांच्या कामाचा दिवस सुरु होईल.
पण त्याला अजून वेळ होता. उंट निवांतपणे समुद्राकडे पाहात बसले होते. काय विचार चालले असतील त्यांच्या मनात? फोटोची फ्रेम मी अडजस्ट केली. चौकटीत आता अलीकडे फिकट मातकट रंगाची वाळूची टेकडी होती. पलीकडे करड्या रंगाचे उंट बसलेले. त्यांच्या गडद तपकिरी माना. त्यांच्या अंगावर लाल पिवळी लाकडे व कापडे..किनार्याकडॆ येणार्या लाटेवरचा पांढरा शुभ्र फेस...आणि पलीकडे समुद्राचे कुठे फिकट निळे,तर कुठे गडद निळे पाणी..
हा फोटो मला खूप आवडतो. रंगसंगती तर सुरेख जमली आहेच पण प्रभातकालीन ताजेपणा व एक निरामय निवांतता या फोटोत प्रतिबिंबित झाली आहे असे मला वाटते.
आता घेऊ या एक लहानशी विश्रांती.....पंधरा दिवसांची....
Monday, May 31, 2010
Saturday, May 22, 2010
समुद्र,मी आणि कोलाज...
आयुष्यात पहिला फोटो काढला होता तो समुद्राचा,हे मी पूर्वी सांगितलेच आहे. तो फ़िल्मवर नीट उतरला नाही ही गोष्ट वेगळी.पण समुद्राची प्रतिमा माझ्या मनाच्या फ़िल्मवर नीटच उमटली होती. त्यावेळी समुद्र जो मनात येऊन बसला तो कायमचाच. समुद्रच तो. तो काय शांत बसणार? वेळोवेळी त्याला भरती येते आणि मग एखाद्या समुद्रकिनार्यावर जाऊन मनमुराद भटकावे वाटते. त्यानंतर अनेक वेळा समुद्र पाहिला. भल्या पहाटे, भर दुपारी, सायंकाळी, रात्री, उत्तररात्री, तारांकित आकाशाखाली, तर कधी शुभ्र चांदण्यात.....त्याची असंख्य रूपे पाहिली, मनात साठवली ,तशीच कॅमेर्यातही बद्ध करून ठेवली. समुद्र प्रत्येक वेळी मला नवाच वाटतो . चिरनूतन !निसर्गाची रूपं तशी चैतन् भारलेली असतात, पण समुद्राचा जिवंतपणा काही निराळाच.
सतत येत राहणार्या आणि ओसरणार्या लाटामुळे समुद्राच्या रूपाला कधी एकसुरिपणा येत नाही नवी लाट नव्या उत्साहाने किनार्याकडे धावत येते ,किनार्यावर विखुरते. समुद्र काहीसा मागे सरकतो. त्याचवेळी मागून येणारी लाट किनार्याशी गळामिठी घेण्यासाठी धावते.जीवनसातत्याचे समुद्राहून भव्य असे
दुसरे प्रतीक नाही
एकदा एका साहित्यसंमेलनासाठी गोव्यात गेलो होतो. त्यावेळी गोव्याच्या किनार्यांवर खूप भटकलो.
पाण्यात उभा असतांना मित्राने मुंबईला काढलेल्या माझ्या फोटोची आठवण झाली. किनार्यावर माझ्यासारखे अनेक जण भटकत होते. त्यापैकी एकाजवळ मी माझा कॅमेरा दिला व त्याला माझा फोटो काढण्याची विनंती केली..त्याने आनंदाने माझी इच्छा पूर्ण केली. घरी गेल्यावर मी तो फोटो संगणकावर चढविला,जुन्या अल्बममधून पुराणा फोटो शोधून काढला ,त्याला स्कॅन केले व तोही नव्या फोटोजवळ नेऊन ठेवला. दोन्ही फोटो एकत्र पाहिले तेव्हा मोठी गंमत वाटली .दोन्हीत खूप
साम्य जाणवले , तसाच बराच फरक देखील. समुद्र तसाच आहे,बदल झाला आहे तो माझ्यात . दोन फोटोत सुमारे ३५ वर्षांचे अंतर आहे. ’अंगावरून’ बरेच पाणी वाहून गेले आहे, [त्यापैकी बरेचसे अंगात साठलेलेही आहे]
..दोन्ही फोटोकडे आळीपाळीने पाहतांना एक मजेशीर विचार मनात आला. दोन्ही फोटोत तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला मी आहे. फक्त पहिल्या फोटोत मी उंबरठ्यातून आत प्रवेश करतो आहे,तर दुसर्या फोटोत उंबरठ्यातून बाहेर पडायची तयारी सुरु आहे. कुठेतरी मी वाचले होते,कुठे ते आता आठवत नाही,-डोंगरावर चढणारा आणि उतरणारा दोघेही एकाच पातळीवर आले तरी ते एकाच भूमिकेत नसतात. हे दोन फोटो पाहतांना मला त्याची आठवण झाली,आणि मी त्या फोटोंचा कोलाज करून टाकला. त्यांना अक्षरश: एका पातळीवर आणले. पहिला फोटो काळापांढरा होता तर दुसरा रंगीत. दोन्हीच्या मिश्रणामुळे एक वेगळाच रंग नव्या फोटोला आला....
अनेकवेळा आपण जुने दिवस आठवतो,त्या दिवसात भटकून येतो. परत आल्यावर असाच एखादा नवा रंग मनावर चढत असेल काय?
असावा....

Wednesday, May 12, 2010
फोटो:कॉनराड रिक्टरचा.

[मागील अंकावरून पुढे चालू.]
कॅमेर्याने केलेल्या प्रयोगाची कहाणी मी गेल्यावेळी सांगितली होती. अर्थात हा प्रयोग मी काही जगात पहिल्यांदा केला होता असे नव्हे. ही तर फक्त एक लहानशीच तांत्रिक खेळी होती.पण ती आपण करण्यातही आनंद होता ना! तेव्हाचा तो आनंद मला अजून आठवतो.
हा आनंद पुन्हा एकदा आठवला तो एका फोटोमुळेच. वर दिलेल्या दोन फ़ोटोपैकी दुसरा फोटो हा रिक्टरने त्याचा स्वत:चा काढलेला दुहेरी फोटो आहे.
रिक्टर हा माझा अत्यंत आवडता लेखक. त्याच्या कादंबर्यांची मी अनेक पारायणे केली आहेत. १९७० च्या सुमारास मी प्रथम रिक्टरच्या कादंबर्यांची जी.ए.नी केलेली मराठी भाषांतरे -’रान’,’शिवार’,व ’गाव’ वाचली,आणि मी त्याच्या प्रेमातच पडलो. मग त्याची अनेक पुस्तके मिळवून वाचली. मराठीत रिक्टरच्या आठ कादंबर्या अनुवादित झाल्या आहेत. पण बरेच दिवस त्याची मूळ इंग्रजी पुस्तके उपलब्ध नव्हती. अजूनही ती तशी दुर्मिळच आहेत.
रिक्टर हा तसा अलक्षित लेखक. उच्चभ्रू टीकाकारांनी त्याला कधी महान म्हटले नाही. त्याचे त्यांनी ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून वर्गीकरण करून टाकले आहे. मात्र त्याच्या कादंबर्या वाचल्यानंतर त्याची असामान्यता कळते. सुमारे एक वर्षापूर्वी त्याचे एक तपशीलवार दीर्घ चरित्र प्रकाशित झाले आहे.[Conrad Richter-A writer's Life.by David R. Johnson]
एखादा माणूस लेखन हेच आपले जीवितकार्य आहे अशी मनाची खूणगाठ बांधून केवढ्या अक्षरनिष्ठेने आयुष्यभर संघर्ष करीत राहतो याचे विलक्षण दर्शन या चरित्रातून घडते.
कॉनराडचे वडील हे एक लोकप्रिय दुकानदार होते. पण वयाची चाळिशी उलटतांना त्यांच्या मनात धर्मगुरु बनण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली . उत्तम चाललेला व्यवसाय बंद करून ते धर्मशिक्षणाच्या कॉलेजमध्ये दाखल झाले. यावेळी कॉनराड फक्त १० वर्षाचा होता. या निर्णयाचा रिक्टर कुटुंबावर फार मोठा परिणाम झाला. अनेक वर्षे त्यांना आर्थिक ओढग्रस्तीच्या परिस्थितीत,अभावाच्या सावलीत काढावी लागली. तारुण्यात प्रवेश करतांना कॉनराडच्या मनावरही कुटुंबाच्या ह्या अवस्थेचा मोठा ताण निर्माण झाला होता. एकीकडे खूप पैसे मिळवून आपल्या आईला सुखात ठेवण्याची स्वप्ने तो पाही,आणि दुसरीकडे आपल्यात ही क्षमता नाही असे वाटून खिन्न व उदास होई.
कॉनराड लहानपणापासून अतीशय लाजराबुजरा ,आत्ममग्न असा होता. मधूनच त्याला उत्साहाचे भरते येई. आपल्या आत दोन वेगवेगळी व्यक्तिमत्वे दडून आहेत असे त्याला तरुणपणापासून जाणवू लागले होते. वर जो फोटो दिला आहे तो कॉनराडने वयाच्या अठराव्या वर्षी काढलेला स्वत:चा Double Exposure फोटो आहे. या फोटोत जे दोन कॉनराड दिसतात त्यापैकी एक कोट ,टाय घालून,घराच्या पायरीवर आरामात बसून हसणारा तरूण आहे. तर दुसरा पायर्याशेजारी कोट न घालता उभा राहिलेला काहीसा बुजलेला तरुण आहे. कॉनराडच्या चरित्रकाराच्या मते,त्याने हा फोटो जाणीवपूर्वक घेतलेला आहे किंवा नाही हे सांगता येत नाही,पण त्याची बाह्य जगात वावरतांना दिसणारी दोन वेगवेगळी रूपे प्रतीकात्मकरित्त्या या फोटोत उमटली आहेत.
हा फोटो पाहतांना मला आणखी एक गोष्ट जाणवली. Double Exposure चा हा प्रयोग कॉनराडने १९०७ साली केला. मी तसाच प्रयोग १९७४ साली केला. पण कॉनराडने केलेला प्रयोग अत्यंत सफाईदार आहे ,दोन प्रतिमांचे मिक्सिंग अतीशय उत्तम जमलेले आहे. तुलनेने मी काढलेला फोटो फारच प्राथमिक स्वरूपाचा वाटतो. अमेरिकन तरुण आणि भारतातील एका लहान गावातला तरुण यांच्यातील पूर्वापारपासूनच्या सांस्क्रुतिक तफावतीचे हे दोन फोटो प्रतीक आहेत असे मला वाटते....
[पुढील गोष्ट पुढील अंकी ]
]
Subscribe to:
Comments (Atom)