Sunday, April 25, 2010

चौकट



[मागील अंकावरून पुढे चालू.]

नोकरी लागली की पहिला कॅमेरा विकत घ्यायचा असे ठरविले होते तरी प्रत्यक्षात कॅमेरा हाती यायला थोडा वेळच लागला.
माझा पहिला पगार होता ३०९रु.६०पैसे,आणि या पैशाला अनेक वाटा होत्या. मुख्य म्हणजे कितितरी वर्षापासून मला खुणावणारी पुस्तके मला विकत घ्यायची होती. पुस्तके हे माझे पहिले प्रेम होते-अजूनही आहे. पगारातील एक ठराविक भाग पुस्तके विकत घेण्यासाठी खर्च करायचा हेही ठरविलेले होते. आपल्या घरी आपला स्वत:चा ग्रंथसंग्रह असावा असे स्वप्न मन पाहू लागले होते. त्यामुळे दुसरीकडे खर्च करायला काही उरतच नव्हते. पण अधूनमधून कॅमेर्‍याचे दुकान खुणावायचेच.
कॅमेरा घेतला तो मात्र अगदी अनपेक्षितपणे. बैंकेत दर महिन्याला एक गरीब पोरगा पगाराच्या दिवशी येऊन लॉटरीची तिकिटे घेण्याचा आग्रह करायचा. त्याच्या मागे लागण्याला कंटाळून, एकदा त्याच्याकडून एक तिकिट विकत घेतले. त्याला चक्क ५० रु.चे बक्षीस लागले. मनात पहिला विचार आला तो कॅमेर्‍याचा. नांदेडला कॅमेरा मिळू शकेल असे एकच दुकान होते.त्या दुकानदाराला विचारले आणि घरी जाताना ५५ रु.चा’ क्लिक ३’ घेऊनच गेलो.
हा एक साधा बॉक्स कॅमेरा होता. अडजस्टमेंट जवळजवळ नव्हत्याच. बघायचे आणि क्लिक करायचे. नंतरचे काही महिने क्लिकमयच होवून गेले. अर्जुनाच्या हाती धनुष्य आल्यावर तो दिसेल त्या वस्तूवर बाण मारू लागला,तसे माझे झाले. पण अर्जुनाला बाण फुकट मिळायचे,आणि मला मात्र रोल विकत घेण्यासाठी व धुण्यासाठी पैसे मोजावे लागायचे,व हे पैसे अनेकदा बजेटमध्ये बसायचे नाहीत. मात्र त्यामुळे एक बरे झाले की निवड करून फोटो काढण्याची सवय लागली. [पुढे डिजिटल कॅमेरा हाती आल्यावर त्या सवयीचे बारा वाजले ती गोष्ट वेगळी. पण ती खूप नंतरची गोष्ट.]
फोटो काढायचे म्हणजे एक तर जवळच्या व्यक्तींचे किंवा निसर्गाचे एवढीच ढोबळ कल्पना सुरुवातीला मनात होती. धाकटी बहीणभावंडे ही तर हक्काची मॉडेल्स. मात्र हळूहळू असे फोटो काढतांना काही वेगळ्या कोनातून काढण्याचा प्रयत्न सुरु झाला.
उदा.बहिणीचा व भावाचा एक फोटो मी भिंतीला पडलेल्या एका छिद्रातून काढला होता. एकदा रात्री मेणबत्तीच्या प्रकाशात फोटो काढण्याचा प्रयत्न केला ,पण तो जमला नाही. बरे या बाबतीत शिकविणारे कुणीच नव्हते.सगळा ट्रायल व एरर चा मामला.
’क्लिक ३’मध्ये फोटो काढल्यानंतर बोटाने रीळ पुढे सरकवून नवी फ़िल्म भिंगासमोर आणावी लागे. एकदा ते रीळ सरकावयाचे राहिले व घेतलेल्या फोटोवरच दुसरा फोटो आला. ते कॉम्बिनेशन मोठे मजेदार वाटले. त्यातून मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली. कॅमेर्‍याचे भिंग अर्धे झाकणारा एक कपडा मी त्याभोवती बांधला. समोर शुभदाला-माझ्या बहिणीला- बसविले,आणि व्ह्यू फ़ाईंडर मधून अंदाजाने तिला अर्ध्या भागात घेऊन फोटो काढला. त्यानंतर दुसरीकडील अर्ध्या भागावर कपडा झाकला व आता तिला उभे करून पुन्हा पहिल्याच निगेटिव्हवर क्लिक केले. आता हा फोटो कसा येईल याची उत्सुकता लागली होती.
रोलमध्ये काही फ़िल्म अजून शिल्लक होत्या,त्या पटापट वापरून टाकल्या व रोल धुण्यास टाकला.
तिसर्‍या दिवशी जेव्हा दुकानात जाऊन प्रिंट पाहिल्या तेव्हा मी स्वत:वरच जाम खुश झालो .डबल एक्स्पोजरचा फोटो छानच आला होता. यंत्राने आखलेली चौकट कल्पनाशक्तीच्या साह्याने मोडता येते हे मला प्रथम तेव्हा जाणवले. बरेच दिवस घरी कुणी आले की मी त्याला तो फोटो दाखवायचो. त्याने कौतुक केले की आपल्यात काही कला आहे असे वाटायचे. अर्थात इतर कलाप्रमाणे तिचाही आवाका मर्यादित आहे हे जाणवायला खूप दिवस जावे लागले. मात्र काही काळ माझा इगो या फोटोमुळे सुखावला गेला होता एवढे खरे.
[पुढील गोष्ट पुढील बुधवारी... .]

Thursday, April 22, 2010

समुद्र,कॅमेरा आणि मी


फोटो काढून घेण्याचे प्रसंग लहानपणी तसे कमीच आले .त्या काळात फोटो काढणे ही चैनेची गोष्ट होती. कॅमेरा हाताळता
येणे तर जवळजवळ अशक्यच.
पहिल्यांदा कॅमेरा हाताळला तो दिवस कोणता होता,आठवत नाही,पण कॅमेर्‍याने पहिला फोटो समुद्राचा काढला होता हे मात्र पक्के ध्यानात आहे.
कॊलेजमध्ये शिकत असतांनाची गोष्ट. मुंबईला एका मित्राकडे आलो होतो. एके दिवशी मित्राने मला समुद्र पाहावयास नेले. नदी किंवा तळे यापेक्षा मोठा पाण्याचा साठा न पाहिलेला मी ,आयुष्यात प्रथमच समुद्र पाहत होतो. नजर जाते तिथपर्यंत पाणीच पाणी हे द्रुष्य विलक्षणच होते. एखादा देखावा नजरेत न मावणे म्हणजे काय असते याचा अनुभव मी प्रथमच घेत होतो. एका पाठोपाठ धावत येऊन किनार्‍यावर आदळणार्‍या लाटा . एक लाट ओसरली की दुसरी तिच्या मागोमाग हजरच. चौपाटीवरल्या वाळूवरून चालतानाही मज्जा वाटत होती. चपला काढून ठेवल्या व धावत धावत पाण्यात शिरलो. लाटा पायावर आदळून किनार्‍याकडे जात होत्या. लाट ओसरली की पाणी परत जाताना पायाखालची वाळू सरकायची. प्रथम भीती वाटली पण नंतर पंचमहाभूतापैकी एकाचे एवढे विशाल दर्शन घडताना शरीर मनाला पंख फुटल्यासारखे झाले.
मित्र किनार्‍यावरून कौतुकाने पाहत होता. त्याने सोबत कॅमेरा आणला होता. माझे व समुद्राचे अनेक फोटो त्याने काढले.
"आता तू माझा फोटो काढ." मित्र अचानक म्हणाला.
फोटो काढून बघण्याची तीव्र इछा मनात निर्माण झाली होतीच,पण संकोचामुळे मी काही बोललो नव्हतो. त्याने कॅमेरा माझ्या हातात दिला. तो म्हणाला,"काही अवघड नाही. हा इथे व्ह्यू फाइंडर आहे.त्यातून पाहायचे. हे बटण क्लिक करायचे."
हे प्रकरण इतके सोपे असेल असे वाटले नव्हते. मी कॅमेरा हातात घेतला व काचेतून पाहिले. समुद्राचा एक तुकडा समोरच्या चौकटीत बंदिस्त झाला होता. मी क्लिक केले. ’फोटो निघाला असेल काय? चांगला आला असेल काय?’फिल्म जोवर धुतली जाणार नाही तोपर्यंत हे कळणे अशक्य होते.
मित्र म्हणाला आता " माझा फोटो काढ."
तो पाण्यात जाऊन उभा राहिला. मी व्ह्यु फाइंडर मधून पाहिले. तो एका कोपर्‍यात दिसत होता. मागे दूरवर समुद्र.
कॅमेरा थोडा उजवीकडे वळविला. आता मित्र मध्यभागी होता. ’कोणता फोटो घ्यावा,चौकटीत काय आले म्हणजे चांगले दिसेल,आकाश किती येऊ द्यायचे? की समुद्रावरच लक्ष केंद्रित करायचे?’ मनात प्रष्न येत होते. पण त्यांची उत्तरे आत्ताच मिळणार नव्हती. खूप वर्षानंतर हिचकॉकचे एक वाक्य वाचण्यात आले. "हा जो समोरचा चौकोन आहे ना,तो कसा भरायचा हे समजले की सिनेमा तयार करता येतो."
अर्थात त्यावेळी हे सारे समजणे कठीण होते. मला आठवते, मी एक फोटो मित्र डावीकडे असताना काढला,एक उजवीकडे असताना,तर तिसरा त्याला मध्यभागी ठेऊन. मल वाटले,’खरेच फोटो काढणे सोपे आहे की.’
दुसर्‍या दिवशी नांदेडला परत गेलो. रोल धुतला की फोटो पाठवितो असे मित्र म्हणाला होता. त्याच्या पत्राची आतुरतेने वाट पाहू लागलो. पंधरा दिवसांनी त्याचे पत्र आले. त्याने लिहिले होते,"सोबत तुझा समुद्रातला फोटो पाठवीत आहे. तू काढलेले चारही फोटो मात्र हलले. नाराज होवू नको. सुरुवातीला असे होतेच."
नाराज तर झालो होतोच. पण त्याच वेळी ठरविले की नोकरी लगल्यावर प्रथम एक कॅमेरा विकत घ्यायचा. पाहू फोटो कसे निघत नाहीत ते....
सोबतचा फोटो हा मित्राने काढलेला माझा आणि समुद्राचा फोटो आहे. फोटोग्राफीमधील माझ्या पहिल्या अपयशाची पार्श्वभूमी या फोटोला आहे.

Tuesday, April 20, 2010

स्मरणरंजन


गेल्यावेळी दाखविलेला फोटो हा माझा सर्वात जुना फोटो असला तरी माझ्याजवळचा सर्वात जुना फोटो वेगळाच आहे.
आई वारल्यानंतर तिच्या पेटीत मला तो सापडला. त्याचवेळी तो काहीसा पिवळा पडू लागला होता. फोटो सुमारे ७०
वर्षापूर्वीचा असावा. आईचे माहेर बीड. घरातली परिस्थिती साधारण असली तरी आईची आई फ़ार रसिक होती. बीडमध्ये
त्या काळी फ़ार तर ४/५ जणाकडे ग्रामोफोन असेल. त्यापैकी एक घर माझ्या आईचे होते. आजोबा कामावर गेले की ती व तिची आई झोपाळ्यावर बसून गाणी ऐकत बसत.
तर आजीपशी आईने एकदा फोटो काढायचा हट्ट धरला. आई आजीची फ़ार लाडकी होती. आजोबा देखील तिच्यावर फ़ार माया करीत. आजीने लगेच आजोबांना सांगून फोटोग्राफ़रला घरी बोलाऊन घेतले.[मी जेव्हा सुरेश मामांना हा फोटो दाखविला तेव्हा त्यांनी मला ही गोष्ट सांगितली.]घराच्या आतल्या आंगणात एक गालिचा टाकला होता. त्यावर एक खुर्ची ठेऊन तिच्यावर सगळ्यात धाकट्या मामाला बसविले होते.या फोटोत ती परकर पोलके घातलेली चिमुरडी आहे ना,ती माझी आई.तेव्हाची कु.कालिंदी राक्षसभुवनकर.
उजवीकडे शर्ट धोतर आणि डोक्यावर काळी टोपी घालून उभे आहेत ते माझे मोठे मामा. माझ्या लहानपणी,मला आठवते,मामा खूपच ऐटबाज दिसायचे. बालपणीच्या आनंदाच्या दिवसापैकी बरेच मी त्यांच्या घरी घालवले आहेत.
जमीनीवर गालिचा अंथरला आहे. त्यावर बसले आहेत ते मधले मामा. दोन्ही मामांच्या डोक्यावर आजोबा घालीत त्या काळ्या टोप्या आहेत. आईने दोन ससे पाळले होते. त्यापैकी एकाने फोटोतही हजेरी लावलेली दिसते. त्याला पकडून ठेवावे की कॅमेर्‍याकडे पहावे अशी धांदल मधल्या मामाची झालेली दिसते.
कॅमेर्‍याने टिपून ठेवलेला हा एक आनंदी क्षण. नंतर काही दिवसांनीच ही चारही भावंडे चार दिशांनी पांगली. एक आई सोडली तर प्रत्येकाच्या वाट्याला खडतर आयुष्य आले. मोठ्या मामावर नोकरीत काहीतरी बालंट आले. कोर्टाच्या वार्‍या सुरु झाल्या. नोकरी गेली. नंतर त्यांनी अनेक व्यवसाय करून पाहिले. पण घसरलेली स्थिती सावरली नाही. दारिद्र्य व दुर्दैवाने
त्यांना पूर्ण ग्रासून टाकले. दिवा लहान होत होत विझून जावा तसे एके दिवशी ते संपून गेले.
ससा घेऊन बसलेले ते दोन नंबरचे सुरेश मामा.लहानपणीच आई वारल्यावर वहिनीशी न पटल्यामुळे ते घरून पळून गेले.
शालेय शिक्षण मध्येच सोडल्यामुळे आयुष्याची घडी विस्कटली ती कायमचीच.त्यांचा आवाज गोड होता,ते उत्तम चित्रे काढायचे.
पण जगण्याच्या खटाटोपात ह्या कला तशाच राहून गेल्या. सारे आयुष्य त्यांनी असे अभावाच्या सावलीतच काढले.
खुर्चीवर बसलेले ते धाकटे रमेश मामा. त्यांना माझ्या आईने आमच्याकडेच ठेऊन घेतले. त्यांनी शेतकी खात्याचा डिप्लोमा केला,बर्‍यापैकी नोकरी लागली. आईला वाटले एक भाऊ तरी मार्गाला लागला. तिने त्यांचे लग्नही करून दिले. पण लग्नानंतर तीन महिन्यातच बायको वारली. हा धक्का त्यांनी धीराने पचविला. काही दिवसांनी दुसरे लग्न केले. पण अचानक आजारी पडून मामाच वारले. एक कहाणी सुरु होत होताच संपली.
आईचे सारे आयुष्य सात मुले व नातेवाईक ,पै पाहुणा यांच्यासाठी कष्ट उपसण्यात गेले. पुढे आम्ही मुले उत्तम शिकलो,आम्हाला चांगल्या नोकर्‍या लागल्या. आम्हाला वाटले,तिला आतातरी आराम देता येईल. मात्र देवाला ते मंजूर नसावे. अचानक कुठूनसा कॅन्सरचा राक्षस आला आणि त्याने तिला गिळून टाकले.
आज मोठे मामा नाहीत,धाकटे मामा नाहीत,आई नाही..या क्षणाचे एकमेव साक्षीदार सुरेशमामा उरले आहेत.
आज या फोटोकडे पाहिले की उदास वाटते. मग आपण अशा भूतकाळातल्या क्षणाकडे का वळतो? आठवून दु:ख होईल हे माहीत असले तरी? स्मरणरंजनामुळे नेमके काय मिळते?...

कॅमेरा आणि मी


कॅमेरा आणि मी.........................
कॅमेर्‍याची पहिली भेट झाली ती वयाच्या सुमारे दहाव्या वर्षी. दर वर्षी
प्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही बरीचशी चुलत भावंडे कन्नडला आमच्या आजोळी जमलो होतो. दिवसभर आंबे खाणे व धिंगाणा करणे या शिवाय दुसरा कार्यक्रम नव्हता. अशात एके दिवशी सकाळीच मोठ्या काकांनी ओर्डर सोडली,” आज सगळ्यांनी लौकर आंघोळी करायच्या. चांगले कपडे घालायचे. आज तुमचे फोटो काढायला काका येणार आहेत.”
’फोटो काढायचे? आमचे? कशासाठी?’ माझ्या मनांत प्रष्नांची भिंगरी सुरु झाली. घरात देवदेवतांचे फोटो होते. माणसाचा असा एकच फोटो होता. माझ्या आजोबांचा. त्यांना मी कधीच पाहिले नव्हते.पहिल्यांदा आजोळी गेलो तेव्हा मी काकांना विचारले होते, “हा फोटो कुणाचा आहे?”
“तुझ्या आजोबांचा-माझ्या वडिलांचा.”
पूर्वी कधीतरी बोलण्यातून आजोबा देवाघरी गेल्याचा संदर्भ आलेला ध्यानात होता. भिंतीवर देवाचे फोटो लावतात तसे देवाघरी गेलेल्यांचे ही संगती जुळत होती. तरी मी विचारले, “फोटो का लावतात?”
“अरे, त्यांची आठवण रहावी म्हणून.”
हे संभाषण मला आठवले. मी विचारले, “आमचे फोटो का काढणार?”
सुटी संपल्यावर तुम्ही आपापल्या गावी जाणार. मग तुमची आठवण माझ्याजवळ नको का?”
फोटो आणि आठवण यांचे असे समीकरण पक्के मनात बसले. तरी मनातले प्रष्न संपले नव्हतेच.
“फोटो कसे काढतात?”
“तुझे प्रष्न संपतच नाहीत बाबा. आता तू उद्या पाहा तुझ्या डोळ्यांनी. पण त्या काकांना काहीबाही विचारून भंडावून सोडू नकोस.”
सकाळी सर्वांच्या आधी माझी आंघोळ झाली होती. चांगले कपडॆ घालून, भांग पाडून पावडर लाऊन मी दारासमोरच्या ओट्यावर जाऊन बसलो होतो. बर्‍याच प्रतीक्षेनंतर एकदाचे फोटोवाले काका आले. त्यांच्याजवळ एक मोठे खोके होते. त्या खोक्यातून जादुगाराच्या पोतडीतून काढावी तशी एकेक वस्तू काढावयास सुरुवात केली. आदल्या वर्षीच दिवाळीच्या सुमारास शाळेत एका जादुगाराने त्याचे कार्यक्रम केलेले मनात बसले होते. त्यामुळे कॅमेरा आणि जादू यांचेही समीकरण मनात ठसले.
काकांनी खोक्यातून आणखी एक खोके काढले. जमीनीवर तीन काठ्या उभारून त्यावर ते खोके बसविले. त्याच्या मागे जावून आमच्याकडे पाहिले, व मग ते आम्हाला पायर्‍यावर नीट बसवू लागले. आम्ही सारेजण अगदी ’देवासारखे’ बसलो होतो. कुणाची हलायचीही हिंमत नव्हती. काका पुन्हा खोक्यामागे गेले. आता त्यांनी सामानातून एक मोठा काळा कपडा काढला. तो डोक्यावर कॅमेर्‍यावर पांघरला. मग डोके बाहेर काढून ते म्हणाले, “आता हलू नका बिलकुल. इकडे बघा, या भिंगाकडे...हं..थोडं हसा...घाबरू नका...”
अनेक सूचना देऊन त्यांच्या मनासारखे झाल्यावर ते पुन्हा कॅमेर्‍याच्या मागे गेले. त्यांनी हलू नका म्हणल्यावर आम्ही आणखी ताठ बसलो. काकांनी कसले तरी बटण खालीवर केले, आणि डोके बाहेर काढून ते म्हणाले, “हं..झाले..उठा आता.”
“काका, फोटो काढला?” मी विचारले.
“हो.”
“मग दाखवा की.”
“आत्ताच नाही, उद्या मी घेऊन येइन.”
एक दिवस वाट पाहायची म्हणजे कठीण होते. पण नाइलाज होता. दुसर्‍या दिवशी सारे लक्ष काकांच्या येण्याकडॆच होते. फोटो पाहिला आणि मनात आश्चर्य दाटून आले. मी असा दिसतो? आजवर आरशात अनेक वेळा चेहरा पाहिला होता. पण फक्त चेहराच. पूर्ण मी असा आहे हे प्रथमच ’दिसत ’होते. आपल्याला जे दिसत नाही ते दाखविणारे यंत्र म्हणजे कॅमेरा असाही काहीसा विचार मनात येऊन गेला.
शेजारचा फोटो हा कॅमेर्‍याने काढलेला माझा पहिला फोटो. या फोटोत मध्यभागी दिसणारा गुटगुटीत पोरगा म्हणजे मी. पुढे या मीचे व कॅमेर्‍याचे जे सख्य जमले त्याची कहाणी यापुढे चालू राहील.........