गेल्यावेळी दाखविलेला फोटो हा माझा सर्वात जुना फोटो असला तरी माझ्याजवळचा सर्वात जुना फोटो वेगळाच आहे.
आई वारल्यानंतर तिच्या पेटीत मला तो सापडला. त्याचवेळी तो काहीसा पिवळा पडू लागला होता. फोटो सुमारे ७०
वर्षापूर्वीचा असावा. आईचे माहेर बीड. घरातली परिस्थिती साधारण असली तरी आईची आई फ़ार रसिक होती. बीडमध्ये
त्या काळी फ़ार तर ४/५ जणाकडे ग्रामोफोन असेल. त्यापैकी एक घर माझ्या आईचे होते. आजोबा कामावर गेले की ती व तिची आई झोपाळ्यावर बसून गाणी ऐकत बसत.
तर आजीपशी आईने एकदा फोटो काढायचा हट्ट धरला. आई आजीची फ़ार लाडकी होती. आजोबा देखील तिच्यावर फ़ार माया करीत. आजीने लगेच आजोबांना सांगून फोटोग्राफ़रला घरी बोलाऊन घेतले.[मी जेव्हा सुरेश मामांना हा फोटो दाखविला तेव्हा त्यांनी मला ही गोष्ट सांगितली.]घराच्या आतल्या आंगणात एक गालिचा टाकला होता. त्यावर एक खुर्ची ठेऊन तिच्यावर सगळ्यात धाकट्या मामाला बसविले होते.या फोटोत ती परकर पोलके घातलेली चिमुरडी आहे ना,ती माझी आई.तेव्हाची कु.कालिंदी राक्षसभुवनकर.
उजवीकडे शर्ट धोतर आणि डोक्यावर काळी टोपी घालून उभे आहेत ते माझे मोठे मामा. माझ्या लहानपणी,मला आठवते,मामा खूपच ऐटबाज दिसायचे. बालपणीच्या आनंदाच्या दिवसापैकी बरेच मी त्यांच्या घरी घालवले आहेत.
जमीनीवर गालिचा अंथरला आहे. त्यावर बसले आहेत ते मधले मामा. दोन्ही मामांच्या डोक्यावर आजोबा घालीत त्या काळ्या टोप्या आहेत. आईने दोन ससे पाळले होते. त्यापैकी एकाने फोटोतही हजेरी लावलेली दिसते. त्याला पकडून ठेवावे की कॅमेर्याकडे पहावे अशी धांदल मधल्या मामाची झालेली दिसते.
कॅमेर्याने टिपून ठेवलेला हा एक आनंदी क्षण. नंतर काही दिवसांनीच ही चारही भावंडे चार दिशांनी पांगली. एक आई सोडली तर प्रत्येकाच्या वाट्याला खडतर आयुष्य आले. मोठ्या मामावर नोकरीत काहीतरी बालंट आले. कोर्टाच्या वार्या सुरु झाल्या. नोकरी गेली. नंतर त्यांनी अनेक व्यवसाय करून पाहिले. पण घसरलेली स्थिती सावरली नाही. दारिद्र्य व दुर्दैवाने
त्यांना पूर्ण ग्रासून टाकले. दिवा लहान होत होत विझून जावा तसे एके दिवशी ते संपून गेले.
ससा घेऊन बसलेले ते दोन नंबरचे सुरेश मामा.लहानपणीच आई वारल्यावर वहिनीशी न पटल्यामुळे ते घरून पळून गेले.
शालेय शिक्षण मध्येच सोडल्यामुळे आयुष्याची घडी विस्कटली ती कायमचीच.त्यांचा आवाज गोड होता,ते उत्तम चित्रे काढायचे.
पण जगण्याच्या खटाटोपात ह्या कला तशाच राहून गेल्या. सारे आयुष्य त्यांनी असे अभावाच्या सावलीतच काढले.
खुर्चीवर बसलेले ते धाकटे रमेश मामा. त्यांना माझ्या आईने आमच्याकडेच ठेऊन घेतले. त्यांनी शेतकी खात्याचा डिप्लोमा केला,बर्यापैकी नोकरी लागली. आईला वाटले एक भाऊ तरी मार्गाला लागला. तिने त्यांचे लग्नही करून दिले. पण लग्नानंतर तीन महिन्यातच बायको वारली. हा धक्का त्यांनी धीराने पचविला. काही दिवसांनी दुसरे लग्न केले. पण अचानक आजारी पडून मामाच वारले. एक कहाणी सुरु होत होताच संपली.
आईचे सारे आयुष्य सात मुले व नातेवाईक ,पै पाहुणा यांच्यासाठी कष्ट उपसण्यात गेले. पुढे आम्ही मुले उत्तम शिकलो,आम्हाला चांगल्या नोकर्या लागल्या. आम्हाला वाटले,तिला आतातरी आराम देता येईल. मात्र देवाला ते मंजूर नसावे. अचानक कुठूनसा कॅन्सरचा राक्षस आला आणि त्याने तिला गिळून टाकले.
आज मोठे मामा नाहीत,धाकटे मामा नाहीत,आई नाही..या क्षणाचे एकमेव साक्षीदार सुरेशमामा उरले आहेत.
आज या फोटोकडे पाहिले की उदास वाटते. मग आपण अशा भूतकाळातल्या क्षणाकडे का वळतो? आठवून दु:ख होईल हे माहीत असले तरी? स्मरणरंजनामुळे नेमके काय मिळते?...

No comments:
Post a Comment