कॅमेरा आणि मी.........................
कॅमेर्याची पहिली भेट झाली ती वयाच्या सुमारे दहाव्या वर्षी. दर वर्षी
प्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही बरीचशी चुलत भावंडे कन्नडला आमच्या आजोळी जमलो होतो. दिवसभर आंबे खाणे व धिंगाणा करणे या शिवाय दुसरा कार्यक्रम नव्हता. अशात एके दिवशी सकाळीच मोठ्या काकांनी ओर्डर सोडली,” आज सगळ्यांनी लौकर आंघोळी करायच्या. चांगले कपडे घालायचे. आज तुमचे फोटो काढायला काका येणार आहेत.”
’फोटो काढायचे? आमचे? कशासाठी?’ माझ्या मनांत प्रष्नांची भिंगरी सुरु झाली. घरात देवदेवतांचे फोटो होते. माणसाचा असा एकच फोटो होता. माझ्या आजोबांचा. त्यांना मी कधीच पाहिले नव्हते.पहिल्यांदा आजोळी गेलो तेव्हा मी काकांना विचारले होते, “हा फोटो कुणाचा आहे?”
“तुझ्या आजोबांचा-माझ्या वडिलांचा.”
पूर्वी कधीतरी बोलण्यातून आजोबा देवाघरी गेल्याचा संदर्भ आलेला ध्यानात होता. भिंतीवर देवाचे फोटो लावतात तसे देवाघरी गेलेल्यांचे ही संगती जुळत होती. तरी मी विचारले, “फोटो का लावतात?”
“अरे, त्यांची आठवण रहावी म्हणून.”
हे संभाषण मला आठवले. मी विचारले, “आमचे फोटो का काढणार?”
सुटी संपल्यावर तुम्ही आपापल्या गावी जाणार. मग तुमची आठवण माझ्याजवळ नको का?”
फोटो आणि आठवण यांचे असे समीकरण पक्के मनात बसले. तरी मनातले प्रष्न संपले नव्हतेच.
“फोटो कसे काढतात?”
“तुझे प्रष्न संपतच नाहीत बाबा. आता तू उद्या पाहा तुझ्या डोळ्यांनी. पण त्या काकांना काहीबाही विचारून भंडावून सोडू नकोस.”
सकाळी सर्वांच्या आधी माझी आंघोळ झाली होती. चांगले कपडॆ घालून, भांग पाडून पावडर लाऊन मी दारासमोरच्या ओट्यावर जाऊन बसलो होतो. बर्याच प्रतीक्षेनंतर एकदाचे फोटोवाले काका आले. त्यांच्याजवळ एक मोठे खोके होते. त्या खोक्यातून जादुगाराच्या पोतडीतून काढावी तशी एकेक वस्तू काढावयास सुरुवात केली. आदल्या वर्षीच दिवाळीच्या सुमारास शाळेत एका जादुगाराने त्याचे कार्यक्रम केलेले मनात बसले होते. त्यामुळे कॅमेरा आणि जादू यांचेही समीकरण मनात ठसले.
काकांनी खोक्यातून आणखी एक खोके काढले. जमीनीवर तीन काठ्या उभारून त्यावर ते खोके बसविले. त्याच्या मागे जावून आमच्याकडे पाहिले, व मग ते आम्हाला पायर्यावर नीट बसवू लागले. आम्ही सारेजण अगदी ’देवासारखे’ बसलो होतो. कुणाची हलायचीही हिंमत नव्हती. काका पुन्हा खोक्यामागे गेले. आता त्यांनी सामानातून एक मोठा काळा कपडा काढला. तो डोक्यावर कॅमेर्यावर पांघरला. मग डोके बाहेर काढून ते म्हणाले, “आता हलू नका बिलकुल. इकडे बघा, या भिंगाकडे...हं..थोडं हसा...घाबरू नका...”
अनेक सूचना देऊन त्यांच्या मनासारखे झाल्यावर ते पुन्हा कॅमेर्याच्या मागे गेले. त्यांनी हलू नका म्हणल्यावर आम्ही आणखी ताठ बसलो. काकांनी कसले तरी बटण खालीवर केले, आणि डोके बाहेर काढून ते म्हणाले, “हं..झाले..उठा आता.”
“काका, फोटो काढला?” मी विचारले.
“हो.”
“मग दाखवा की.”
“आत्ताच नाही, उद्या मी घेऊन येइन.”
एक दिवस वाट पाहायची म्हणजे कठीण होते. पण नाइलाज होता. दुसर्या दिवशी सारे लक्ष काकांच्या येण्याकडॆच होते. फोटो पाहिला आणि मनात आश्चर्य दाटून आले. मी असा दिसतो? आजवर आरशात अनेक वेळा चेहरा पाहिला होता. पण फक्त चेहराच. पूर्ण मी असा आहे हे प्रथमच ’दिसत ’होते. आपल्याला जे दिसत नाही ते दाखविणारे यंत्र म्हणजे कॅमेरा असाही काहीसा विचार मनात येऊन गेला.
शेजारचा फोटो हा कॅमेर्याने काढलेला माझा पहिला फोटो. या फोटोत मध्यभागी दिसणारा गुटगुटीत पोरगा म्हणजे मी. पुढे या मीचे व कॅमेर्याचे जे सख्य जमले त्याची कहाणी यापुढे चालू राहील.........

share market king waren bafe also get 1 st share at the age of 10. he is good in his job and you also good in your writing of film.
ReplyDeletethank you
lalit bade
007